मुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) पारदर्शक, सुरक्षित आणि तणावरहित वातावरणात पार पडावी, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार, अफवा किंवा सुरक्षेतील त्रुटी होऊ नयेत यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गृह, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, पोलीस, सायबर सुरक्षा आणि परीक्षा व्यवस्थापनाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
बैठकीस गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त शिरीष जैन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सहसचिव संतोष खोरगडे, राज्य सूचना विज्ञान अधिकारी सपना कपूर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहिली पाहिजे. या यंत्रणांवर सतत देखरेख ठेवून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ कारवाई केली जावी. तसेच परीक्षेशी संबंधित संवेदनशील माहितीच्या सुरक्षेसाठी सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये ओळख पडताळणी आणि उमेदवार तपासणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक उमेदवाराची ओळख आणि प्रवेश प्रक्रिया नियमानुसार व काटेकोरपणे पार पाडली जावी. बनावट ओळखपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला थारा मिळू नये, यासाठी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.
विद्यार्थी आणि पालकांमध्ये परीक्षेबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी प्रभावी संवाद व्यवस्था महत्त्वाची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, परीक्षा प्रक्रियेसंदर्भातील अचूक आणि अधिकृत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत वेळेवर पोहोचली पाहिजे. यासाठी समाजमाध्यमे आणि अन्य माध्यमांचा प्रभावी वापर करून व्यापक जनजागृती करण्यात यावी. तसेच परीक्षेबाबत कोणत्याही अफवा, चुकीची माहिती किंवा दिशाभूल करणारे संदेश प्रसारित झाल्यास त्याचे तातडीने खंडन करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात यावी. यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होणार नाही.
पुणे आणि लातूर या दोन महत्त्वाच्या केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परीक्षा देत असल्यामुळे तेथील सुरक्षा आणि प्रशासकीय व्यवस्था अधिक सक्षम ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षा केंद्र परिसरात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा, स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थापन, वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन सेवांची तयारी पूर्ण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्यात मान्सून सक्रिय होत असल्याने पावसाच्या पार्श्वभूमीवर विशेष पूर्वतयारी ठेवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुसळधार पाऊस, वाहतूक कोंडी किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर परिणाम होऊ नये, यासाठी पर्यायी नियोजन तयार ठेवण्यावर भर देण्यात आला.
जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करून परीक्षा सुरळीत पार पाडावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे आणि कोणतीही समस्या उद्भवल्यास तातडीने त्यावर उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी राष्ट्रीय परीक्षण एजन्सी (NTA) चे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सादरीकरणाद्वारे महाराष्ट्रातील नीट परीक्षा व्यवस्थेची माहिती दिली. राज्यातील परीक्षा केंद्रांची संख्या, केंद्रांवरील उपलब्ध सुविधा, सुरक्षा उपाययोजना, उमेदवार व्यवस्थापन आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा सविस्तर आढावा त्यांनी सादर केला. तसेच केंद्र सरकार, एनटीए आणि राज्य प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित असलेल्या या महत्त्वाच्या परीक्षेकडे संपूर्ण प्रशासनाचे लक्ष असून, पारदर्शकता, सुरक्षा आणि विश्वासार्हता या तीन प्रमुख बाबींवर विशेष भर देण्यात येत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. विद्यार्थ्यांना निर्भय आणि सकारात्मक वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
