सांगोला :तालुक्यातील मांजरी गावात सुरू असलेल्या रम्मी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण आणि सांगोला पोलिसांनी संयुक्तरीत्या धडक कारवाई करत १६ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १ लाख ९० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकरणात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) व्यतिरिक्त आणखी दोन नवीन कलमे समाविष्ट करण्यात आल्याने तपासाला अधिक गती मिळणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल यश मधुकर देवकते (ब. नं. ८३) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी एकहतपूर बीट परिसरात नियमित गस्त घालत होते. याचवेळी एका विश्वासार्ह बातमीदारामार्फत मांजरी गावात सांगोला-पंढरपूर मार्गालगत असलेल्या हॉटेल माउली टी सेंटर व नाष्टा सेंटरच्या बाजूला काही इसम पैशांवर रम्मी जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी कोणताही विलंब न करता कारवाईची रणनीती आखली. पंचांना सोबत घेत पथकाने घटनास्थळ गाठले. तेव्हा हॉटेलच्या शेजारील लिंबाच्या झाडाखाली काही व्यक्ती दोन गटांमध्ये विभागून गोलाकार बसलेल्या अवस्थेत दिसून आल्या. पोलिसांनी संशयित हालचालींची खात्री करत परिसराला वेढा घालत अचानक छापा टाकला. ही कारवाई दुपारी सुमारे २.३५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी छापा टाकताच उपस्थित इसमांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत सर्वांना जागीच पकडून ताब्यात घेतले. पंचासमक्ष आरोपींना त्यांची नावे व पत्ते विचारण्यात आले. प्राथमिक चौकशीदरम्यान मांजरी येथील नवनाथ गणपत शिनगारे हा सदर जुगार अड्डा चालवत असल्याचे समोर आले. तसेच घटनास्थळी उपस्थित सर्वजण पैशांच्या स्वरूपात रम्मी नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपींची अंगझडती घेतली. यावेळी विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, रोख रक्कम आणि ५२ पानी पत्त्यांचे डाव आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये रेडमी, व्हिवो, सॅमसंग, ओपो, मोटोरोला आणि पोको कंपनीच्या मोबाईलचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व साहित्य पंचनामा करून ताब्यात घेतले.
या कारवाईत आरोपींकडून वेगवेगळ्या प्रमाणात रोख रक्कम आणि साहित्य हस्तगत करण्यात आले. त्यामध्ये तालीफ शफोद्दीन मुजावर याच्याकडून सर्वाधिक ४१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर सागर भास्कर चव्हाण याच्याकडून २९ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. इतर आरोपींकडून देखील मोबाईल फोन, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य मिळाले. सर्व आरोपींकडून मिळून आलेली एकूण १ लाख ९० हजार ४५० रुपयांची रोकड व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये मधुकर सदाशीव भडंगे, विठ्ठल नाना नलवडे, योगेश मोहन शिनगारे, ज्योतीबा जगन्नाथ घोरपडे, धनंजय तातोबा पाटील, साहील जावेद मुलाणी, मुरलीधर विठोबा कांबळे, कुमार बजरंग पवार, संजय रंगनाथ नाईकवाडी, मंगेश रामचंद्र अंकुशराव, संजय नामदेव गावडे, संतोष बलभीम कांबळे, तालीफ शफोद्दीन मुजावर, किसन महादेव शिनगारे, सागर भास्कर चव्हाण आणि बिरुदेव शंकर बुरंगे यांचा समावेश आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगोला पोलिसांच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे पार पाडली. कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/४२५ विजयकुमार भरले, पोकॉ/२०५९ समर्थ गाजरे, पोकॉ/२१५३ सागर ढोरेपाटील तसेच सांगोला पोलीस ठाण्याचे पोहेकॉ/१७६८ गवळी, पोकॉ/२७६ सावंजी आणि पोकॉ/५३६ डोळस यांनी सक्रिय सहभाग घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही मोहीम अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवली असल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांपासून सांगोला तालुक्यात विविध ठिकाणी अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. जुगार, मटका, अवैध दारूविक्री तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यांच्या संयुक्त कारवाया सुरू आहेत. मांजरी येथील कारवाई ही त्या मोहिमेचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
सदर प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासादरम्यान नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या दोन अतिरिक्त कलमांमुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक स्वरूपात केला जाणार आहे. जुगार अड्डा नेमका किती दिवसांपासून सुरू होता, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, आर्थिक व्यवहार कसे होत होते याचाही तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींमध्ये पोलिसांच्या वाढत्या कारवाईमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.
