सोलापूर : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी अधिकृत शासकीय व खासगी रुग्णालयांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. रुग्णांकडून उपचार, शुल्क आकारणी किंवा वैद्यकीय हलगर्जीपणाबाबत एकही तक्रार येता कामा नये, अन्यथा संबंधित रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवार, जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ, नगरपालिकेचे जिल्हा प्रशासन अधिकारी योगेश डोके, विविध शासकीय व खासगी रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी, प्रतिनिधी तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत कुंभार उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात सध्या या दोन्ही योजनांतर्गत एकूण 123 शासकीय व खासगी रुग्णालये अधिकृतपणे समाविष्ट आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या रुग्णालयांनी अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांनी कोणत्याही प्रकारे रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी प्रति कुटुंब पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये 27 विशेष वैद्यकीय विभागांअंतर्गत तब्बल 2399 प्रकारच्या आरोग्य उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या पात्र रुग्णांना या योजनेचा लाभ तात्काळ उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा अडथळा निर्माण होऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.
“रुग्णांच्या तक्रारी होताच कामा नयेत. रुग्णालयांनी उपचार करताना पारदर्शकता राखावी. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र रुग्णांपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे सांगत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी आपण स्वतः जिल्ह्यातील रुग्णालयांना अचानक भेटी देणार असल्याचे जाहीर केले. या भेटीदरम्यान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना योग्य सेवा न देणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीत रुग्णालयांमध्ये योजनांबाबत जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला. सर्व अधिकृत रुग्णालयांच्या दर्शनी भागात योजनांची माहिती, टोल फ्री क्रमांक तसेच लाभ प्रक्रियेविषयीची माहिती स्पष्टपणे लावण्याचे निर्देश देण्यात आले. सध्या जिल्ह्यातील 123 अधिकृत रुग्णालयांपैकी 95 ठिकाणी ‘आरोग्यमित्र’ नियुक्त करण्यात आले असून उर्वरित 28 रुग्णालयांमध्ये तातडीने आरोग्यमित्र नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी चांगले काम करणाऱ्या रुग्णालयांचे कौतुक करताना, त्यांच्यासमोरील अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. यासोबतच लाभार्थ्यांचे रेशन कार्ड वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीत आरोग्य विभागाच्या कामगिरीचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधून प्रतिदिन किमान दहा हजार आरोग्य कार्ड तयार करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सोलापूर जिल्ह्यात कार्ड निर्मितीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे नमूद करत त्यांनी या मोहिमेला अधिक गती देण्याची आवश्यकता व्यक्त केली.
“ही योजना मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या प्राधान्यक्रमातील महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा या योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात अग्रेसर राहिला पाहिजे,” असे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका क्षेत्रात लाभार्थ्यांची कार्ड निर्मिती वाढविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.
याशिवाय, ग्रामीण भागात योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आशा सेविकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले. कार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेत आशा सेविकांचे सहकार्य वाढविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी बैठकीत बोलताना सर्व अधिकृत रुग्णालयांनी लाभार्थी रुग्णांना या योजनांमध्ये समाविष्ट करून दर्जेदार उपचार द्यावेत, तसेच कोणत्याही प्रकारची तक्रार निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत कुंभार यांनी या योजनांची माहिती ग्रामीण स्तरापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी मोहीम राबविण्याची मागणी केली. तसेच रुग्णालयांची यादी आणि उपलब्ध आजारांवरील उपचारांची माहिती मराठीत उपलब्ध करून द्यावी, अशीही त्यांनी सूचना केली. काही रुग्णालयांनी योजना राबविताना येणाऱ्या अडचणींबाबत प्रशासनास माहिती दिली.
प्रारंभी जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ यांनी योजनांविषयी सविस्तर माहिती सादर केली. त्यांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्यापासून महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे पोर्टल एकत्रितपणे कार्यरत झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या 8 लाख 73 हजार 167 कुटुंबे या योजनांसाठी पात्र असून लाभार्थ्यांची संख्या 40 लाख 91 हजार 996 इतकी आहे. आतापर्यंत 15 लाख 75 हजार 399 ई-कार्ड तयार करण्यात आले आहेत. तसेच वय वंदना योजनेंतर्गत 70 वर्षांवरील नागरिकांची 20 हजार 987 कार्ड तयार झाली असून या योजनेतील एकूण लाभार्थी संख्या 2 लाख 54 हजार 602 इतकी असल्याची माहिती त्यांनी दिली.
