सोलापूर : कार्तिकेयन एस. हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) महाराष्ट्र केडरचे अधिकारी असून त्यांनी आपल्या कार्यक्षमतेने प्रशासनात वेगळी छाप निर्माण केली आहे. सध्या ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत होते. मूळचे तामिळनाडू राज्यातील असलेल्या कार्तिकेयन एस. यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून प्रशासनात प्रवेश केला.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी स्थानिक प्रशासन बळकट करण्यावर भर दिला. नाशिकमध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) अंतर्गत प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी आदिवासी भागातील विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केली.
कोल्हापुरात येण्यापूर्वी त्यांनी पुणे महानगरपालिका मध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करताना पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या नागरी समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबवल्या.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असताना त्यांनी जलजीवन मिशन, ग्रामीण रस्ते आणि स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रित केले. प्रशासनात पारदर्शकता वाढवण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर वाढवण्यावर त्यांनी भर दिला. शासकीय योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ते स्वतः ग्रामीण भागात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधतात.
तसेच, ‘समृद्ध शाळा’ आणि ‘आदर्श PHC’ सारखी उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवून ग्रामीण विकासाला नवे दिशा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा परिषदेत विकासाची गती वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून नवीन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार निलेश पाटील, पंढरपूर चे तहसिलदार सचिन लंगुटे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या 2 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली तर सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती झाली आहे.

