नाझरे : सांगोला तालुक्यात गेल्या ५५ वर्षांपासून शेतकरी कामगार पक्ष मजबूतपणे उभा असून एकहाती सत्ता गाजवणाऱ्या स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आमदारकीची धुरा सांभाळली आहे. मात्र, सध्याच्या काळात सुरू असलेले राजकारण अत्यंत घाणेरडे व खालच्या पातळीवर गेले असल्याची तीव्र चिंता समाधान धायगुडे यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये दडपशाही, दादागिरी व गुंडगिरीचे प्रकार वाढताना दिसत असून हे लोकशाहीला शोभणारे नाही. सुज्ञ नागरिक व मतदार बांधव-भगिनींनी येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकांकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या राजकारणाला जनता कधीच मान्यता देणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
२०२९ च्या आमदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापच्या सर्व कार्यकर्त्यांनी आताच जागरूक होऊन संघटन मजबूत करावे, जनतेशी थेट संवाद वाढवावा आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करावे, अशी साद समाधान धायगुडे यांनी दिली. त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, पक्षाची वैचारिक परंपरा जपत सकारात्मक राजकारणातूनच जनतेचा विश्वास अधिक दृढ करावा.
