सांगोला : मा. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विचारांचे वारसदार व विश्वासू सहकारी असलेले माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आयोजित केलेल्या तीन दिवसीय मोफत शासकीय सेवा केंद्राला सांगोला शहर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
पहिल्याच दिवशी केंद्रात महिला भगिनी, विद्यार्थी, शेतकरी व वृद्ध नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या केंद्रात आयुष्मान भारत कार्ड, लाडकी बहीण योजना ई-केवायसी, आधार कार्ड दुरुस्ती आणि नवीन आधारकार्ड जारीकरणासह अनेक शासकीय सेवांचा मोफत लाभ नागरिकांना मिळाला.
शासकीय कार्यालयांची दारे ठोठावत फिरावे लागणाऱ्या नागरिकांना या उपक्रमामुळे एकाच ठिकाणी सर्व सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध झाल्या. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हा उपक्रम पुढील दोन दिवस नागरिकांसाठी सुरू राहणार असून, सांगोला परिसरात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे फॉर्म भरून दाखल करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया निशुल्क करण्यात आल्याने नागरिकांचे समाधान अधिक वाढले आहे.
या केंद्राचे यशस्वी आयोजन करण्यासाठी रमेश म्हेत्रे, अतुल उकळे, प्रफुल्ल सादिगले, प्रज्वल इंगळे, सार्थक पैलवान, रोहन धोत्रे, हरीभाऊ कोरे, रुद्र सादिगले, प्रविण शिवपुजे, सल्लाउद्दीन नदाफ, प्रणव देशमुख, शिवलिंग उकळे, अनिल गाडे, सुधिर उकळे, सचिन खंदारे, प्रितम देशमुख, गणेश गुळमिरे, बापु सपाटे, युवराज पैलवान, विजय पैलवान, अनिकेत गोंजारी, शिवतेज तेली यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमाबद्दल बोलताना माजी नगरसेवक सोमेश यावलकर म्हणाले, समाजाच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहणे हीच आमची प्रेरणा आहे. सामान्य नागरिकांना शासकीय कागदपत्रांच्या प्रक्रियेत मदत व्हावी, हा उद्देश होता. समाजाने दिलेल्या प्रेमाची परतफेड सेवा करून करायची आहे.वाढदिवस साजरा करण्यापेक्षा तो गोरगरीबांच्या सेवेसाठी उपयोगात आणणे, हेच खरे समाधान आहे.
सांगोला तालुक्यात या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असून, अनेकांनी सोमेश यावलकर यांच्या या सामाजिक बांधिलकीचे खऱ्या अर्थाने लोकसेवेचे उदाहरण असे कौतुक केले आहे.
