विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर प्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरू; कॉरिडॉर रद्द करण्याची मागणी

पंढरपूर / प्रतिनिधी : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील चौफाळा ते महाद्वार घाट दरम्यान प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉरसाठी बाधितांची सामाजिक-आर्थिक माहिती संकलित करण्याचे सर्वेक्षण झाले आहे. हे सर्वेक्षण १२ विशेष पथकांद्वारे येत्या चार दिवसांत पूर्ण केले जाणार असून, सुमारे ६३० मालमत्ताधारक यामध्ये समाविष्ट आहेत.
या पथकांमध्ये विद्यार्थी तसेच पंढरपूर नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रशासनाने सर्व मालमत्ताधारकांना सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कॉरिडॉर प्रकल्पामुळे मंदिर परिसरातील गर्दीचे व्यवस्थापन सुलभ होईल, अशी प्रशासनाची भूमिका आहे. यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्थानिक रहिवासी, व्यापारी आणि विक्रेत्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला होता. त्यानंतरच प्राथमिक सर्वेक्षणास सुरूवात झाली आहे.
प्रशासनाकडून या सर्वेक्षणाद्वारे मालमत्तेचा प्रकार, जागेचा वापर, उत्पन्नाची माहिती आदी बाबी संकलित केल्या जात आहेत. या माहितीच्या आधारे बाधित कुटुंबांना भरपाई व पुनर्वसनाबाबत योग्य तो प्रस्ताव तयार केला जाणार आहे. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यासंदर्भात बाधितांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
कॉरिडॉर रद्द करण्याची मागणी
दरम्यान, काही बाधित रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी “यात्रेतील गर्दी पाहून आमची घरे पाडू नका, वस्तुस्थिती समजून घ्या,” असा आक्षेप नोंदवला. याआधीही घरांचे अधिग्रहण होऊनही योग्य मोबदला न मिळाल्याचा अनुभव त्यांनी मांडला. त्यामुळे काहींनी कॉरिडॉर प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.