पोलिसांवर धावला बिअर शॉपी चालक; “बघतोच तुम्हाला” म्हणत दिली धमकी

सांगोला / प्रतिनिधी: रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या पोलिस कारवाईदरम्यान बिअर शॉपीचा चालक पोलिसांवरच ओरडत “तुम्हाला बघतोच” अशी धमकी देत अंगावर धावून गेला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि अवैध दारू विक्रीचा दुहेरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली महूद येथे रस्त्यावरचे अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिस पथक तैनात होते. महूद-आटपाडी रस्त्यावरील बिअर शॉपीसमोर लावलेला फलक वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने पोलिसांनी तो काढण्यास सांगितले.
तेव्हा शॉपीचा चालक हा संतप्त झाला. “माझं कोण आहे माहीत नाही का? बोर्डाला हात लावू नका,” असे म्हणत तो पोलिसांवर धावून गेला. त्याने सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
दरम्यान, या शॉपीमध्ये अवैधरित्या देशी व विदेशी दारू विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पंचा समक्ष दुकानाची झडती घेतली असता, २७,८६६ रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. बिअर शॉपीच्या मालकाकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे माहिती झाले.
पोलिस नाईक अंकुश नलवडे यांच्या फिर्यादीवरून बिअर शॉपी मालकच्या याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.