पहलगाम हल्ल्याला उत्तर – दहशतवाद्यांवर लष्कराचा ‘पहिला प्रहार’

आसिफ शेख आणि आदिल ठोकर यांच्या घरांवर बुलडोझर; लष्कराची ठोस कारवाई
पहलगाम/प्रतिनिधी: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन स्थानिक दहशतवाद्यांची घरं आज लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात आली.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यांत ही कारवाई पार पडली. आदिल ठोकर या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचे घर स्फोटकांच्या मदतीने उडवण्यात आले, तर दुसरा दहशतवादी आसिफ शेख याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. ही कारवाई करताना आजूबाजूची घरे रिकामी करण्यात आली होती, जेणेकरून नागरिकांचे प्राण वाचवता येतील.
दहशतवादी अजूनही फरार
हल्ल्याच्या दिवशीच आसिफ आणि आदिल फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे. बेसरन खोऱ्यापर्यंत पाकिस्तानी दहशतवाद्यांना मार्गदर्शन करून पोहोचवण्यात या दोघांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.
आदिल ठोकरचं पाकमध्ये प्रशिक्षण
मिळालेल्या माहितीनुसार, आदिल ठोकर २०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवादाचं प्रशिक्षण घेऊन परतला होता. पहलगाम हल्ल्याच्या मागे त्याची भूमिका असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.
शोधादरम्यान संशयास्पद बॉक्स
मोहगामा येथे आसिफ शेखच्या घरात तपास करत असताना सुरक्षा दलांना एक संशयास्पद बॉक्स सापडला. बॉक्समधून बाहेर आलेल्या तारांमुळे सतर्क झालेले जवानांनी घटनास्थळीच हा बॉक्स निष्क्रिय केला. यावेळी एक छोटासा स्फोट झाला; सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लष्कराचं स्पष्ट धोरण – दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई या कारवाईमुळे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक नेटवर्कला धक्का बसण्याची शक्यता आहे. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून असा संदेश दिला जात आहे की, देशद्रोह्यांना आधार देणाऱ्यांनाही परिणाम भोगावे लागतील.