सांगोला पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पो.नि.विनोद घुगे ॲक्शन मोडवर; रुजू होताच केली शहरात मोठी कारवाई

सांगोला/प्रतिनिधी:सांगोला शहरातील बेलगाम वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पदभार स्वीकारताच ॲक्शन मोडमध्ये येत कारवाईचा दणका दिला. मंगळवार, २२ एप्रिल रोजी त्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण, बेकायदा वाहन पार्किंग आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या दुकानांवर तात्काळ कारवाई केली.
शहरातील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय
पोलीस निरीक्षक घुगे यांनी तहसील कार्यालय ते स्टेशन रोडदरम्यान, अण्णाभाऊ साठे चौक, जय भवानी चौक, महात्मा फुले चौक आणि वासुद चौक यांसह विविध भागांमध्ये रस्त्याच्या कडेला लावलेले हातगाडे, स्टॉल्स आणि वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली.
दोन दिवसांची अंतिम मुदत
घुगे यांनी सर्व लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना दोन दिवसांची अंतिम मुदत देत, रस्त्यावर केलेली अतिक्रमण स्वतःहून हटविण्याचे आदेश दिले. “दोन दिवसांत रस्ता मोकळा न केल्यास कारवाई टाळता येणार नाही; कोणतीही गय केली जाणार नाही ” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी समर्पित पावले
या कारवाईत पोलीस निरीक्षकांसोबत संपूर्ण अधिकारी आणि कर्मचारीवर्ग सहभागी होता. शहरात अलीकडील काळात अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने, ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे.