पत्नी आणि मित्राच्या अनैतिक संबंधामुळे पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या!

पुणे प्रतिनिधी: पत्नी आणि तिच्या मित्रामधील अनैतिक संबंधामुळे मानसिक त्रास सहन न झाल्याने एका रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हांडेवाडी रोडवरील सिद्धीविनायक विहार येथे घडली. आत्महत्या करण्याआधी त्याने आपल्या बहिणीला फोन करून फाशी घेणार असल्याचे सांगितले होते. या प्रकरणी पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव सचिन सतिश गिरी असून, त्याच्या बहिणीने सविता संतोष भारती (वय ३९) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी कोमल सचिन गिरी आणि रवींद्र मेमाणे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
१७ एप्रिलच्या पहाटे १ ते सकाळी ११ च्या दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन गिरी याने काही दिवसांपूर्वी रवींद्र मेमाणे याच्याकडून व्याजावर पैसे घेतले होते. पैसे परत करत असतानाही, गिरी घरात नसतानाही मेमाणे वारंवार त्याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीशी संपर्क करत होता. यामुळे सचिन आणि पत्नी कोमल यांच्यात सतत वाद होत होते.
या वादांमुळे त्रस्त झालेल्या सचिनने आत्महत्येपूर्वी बहिणीला फोन करून “मी फाशी घेणार आहे,” असे सांगितले. यावेळी पत्नी कोमलही कॉन्फरन्स कॉलवर होती. त्यानंतर कोमलने “मरू दे, मला काय फरक पडत नाही,” असे म्हणत फोन बंद केला. सकाळी बहिणीने आईला घरी पाठवले असता घराचे दार बंद होते. वरच्या मजल्यावरून आत पाहिल्यावर सचिनने गॅलरीतून नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गायत्री बैरागी करत आहेत.