श्रीरामनवमी निमित्त सांगोल्यात भव्य शोभायात्रा उत्साहात पार पडली; पाहा मिरवणूकीतील व्हिडीओ

सांगोला : श्रीरामनवमीच्या पावन निमित्ताने सांगोला शहरात आज सकल हिंदू समाज व श्रीराम प्रतिष्ठान सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आणि दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण सांगोला शहरात या शोभायात्रेमुळे धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

शोभायात्रेला सायंकाळी ६ च्या सुमासार वाढेगाव नाका येथून सुरुवात झाली. कडलास रोड, वासूद चौक, महात्मा फुले चौक, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालय, आणि अंबाबाई मंदिर मार्गे ही यात्रा पार पडली.
या शोभायात्रेत प्रभू श्रीरामचंद्रांची अतिशय देखणी आणि सुबक मूर्ती खास आकर्षणाचे केंद्र होती. रामभक्तांच्या जयजयकारांनी शहर दुमदुमून गेले होते.

रामभक्त आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत या शोभायात्रेला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले. श्रीराम नामाचा गजर करत सांगोल्यात रामभक्तांनी श्रद्धेने नटलेली शोभायात्रा अनुभवली.

या यात्रेमुळे संपूर्ण शहरात एक वेगळा धार्मिक आणि संस्कृतीमय आनंद निर्माण झाला होता. आयोजकांनी शिस्तबद्ध आणि भव्य शोभायात्रेचे आयोजन केल्याबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.