Mobile Tower : सांगोल्यात महिलांचा रोष! शिक्षक कॉलनीसमोरील मोबाईल टॉवरचे काम थांबवले

सांगोला (प्रतिनिधी): एखतपूर रोडवरील शिक्षक कॉलनीसमोर (mobile tower) उभारण्यात येणाऱ्या नव्या मोबाईल टॉवरच्या कामाला स्थानिक महिलांनी कडाडून विरोध करत काम थांबवले. मानवी आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांचा विचार करत महिलांनी थेट बांधकामस्थळी येऊन जेसीबीच्या मदतीने सुरू असलेले खोदकाम रोखले.
महिलांचा ठाम विरोध असल्याचे दृश्य आज सकाळपासून पाहायला मिळाले. “मोबाईल टॉवरमुळे (mobile tower ) निर्माण होणारे किरणोत्सर्ग आरोग्यास घातक ठरतात,” असा मुद्दा महिलांनी स्पष्टपणे मांडला. या परिसरात आधीच शाळा, शासकीय कार्यालये व दाट लोकवस्ती असल्याने भविष्यातील धोका ओळखून महिलांनी एकत्र येत आवाज उठवला.
पूर्वीचे अनुभव ठरले प्रेरणा
याआधीही याच परिसरात दोन ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र महिलांच्या एकजुटीमुळे ते थांबवण्यात यश आले होते. याच अनुभवाचा आधार घेत आज पुन्हा शुभांगी पवार, जयश्री पवार, सुमित्रा बिराजदार, श्रीदेवी बिराजदार, आशा बनकर, शांता तनंगे, मनीषा बोराटे यांच्यासह अनेक महिलांनी एकत्र येऊन काम थांबवले.
“आरोग्यावर परिणाम होईल, म्हणून विरोध!”
यावेळी महिलांनी सांगितले की, “टॉवरमुळे आजार (mobile tower ) वाढतात, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध आहे. आम्ही आमच्या कुटुंबाच्या, मुलांच्या आरोग्याशी तडजोड करू शकत नाही. म्हणूनच हे काम आज थांबवले आणि भविष्यातही होऊ देणार नाही.”