पुणे/ प्रतिनिधी : श्रांतवाडीतील कळस भागात एका महिलेला भरचौकात थांबवून अश्लील वक्तव्य करत तिचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सराइत गुन्हेगार तरुण व त्याच्या दोन साथीदारांविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
” मी या भागातला दादा आहे!” — सराइताचा महिलेला दम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विश्रांतवाडीत राहणारी असून, ती आळंदी रस्त्यावरील कळस भागात आपल्या नातेवाइकांकडे जात होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तीन तरुणांनी तिचा पाठलाग करत छेड काढली.
“ मी या भागातला दादा आहे… तू खूप सुंदर दिसतेस ”
असे म्हणत अश्लील शब्दांत तिचा विनयभंग केला. त्याच्यासोबत असलेल्या दोघांनीही महिलेशी अश्लील संवाद साधत त्रास दिला.
तक्रार दाखल; पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने तातडीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तरूणा वर व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध विनयभंग व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
शहरातील तसेच उपनगरांतील टवाळखोरांनी महिलांना छेडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांचा पाठलाग करून अश्लील वागणूक दिली जाते.
अशा घटनांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कठोर कारवाईची मागणी
स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांकडून पोलिसांनी अशा सराईत गुन्हेगारांविरोधात त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
“ सडकछाप टवाळखोरांविरोधात कडक पावले उचलली गेली पाहिजेत, अन्यथा महिलांचे रस्त्यावर चालणेही कठीण होईल,” असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
