दारूसाठी पैशांच्या वादातून खून; संशयित मुलाचे नाव समोर येताच आईने केली आत्महत्या

कवठेमहांकाळ / प्रतिनिधी: दारू प्यायला पैसे न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ४० वर्षीय व्यक्तीची हत्या झाली असून, या प्रकरणात मुलाचे नाव आल्याने संशयिताची आईने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना कुकटोळी गावात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय ४०, रा. कुकटोळी असून, १८ मे रोजी संध्याकाळपासून बेपत्ता होते. दुसऱ्या दिवशी गावातील हायस्कूलच्या मागे त्यांचा गंभीर जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यांना मिरजच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी तपास सुरू करताच सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपी चुलतभाऊ यांच्यावर संशय घेतला गेला. चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. दारूच्या पैशांवरून वाद झाल्यानंतर आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले.
या प्रकरणात संशयिताची आई वय ४३ तीव्र मानसिक धक्क्यामुळे घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. संशयिताचे वडील लहानपणीच वारल्याने तो आईसह राहत होता. मुलाच्या गुन्ह्यातील सहभागाचा धक्का आईला सहन झाला नाही.
या दुहेरी घटनांमुळे संपूर्ण कुकटोळी गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कवठेमहांकाळ पोलिस उपनिरीक्षक करत आहेत.