सख्ख्या भावाचे पक्के प्रेम; बंधुप्रेमाची ह्रदय द्रावक कहानी, लहान भावाच्या दुःखाने मोठ्या भावाने सोडले प्राण

मंगळवेढा / प्रतिनिधी: मंगळवेढा शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आजारी असलेल्या आपल्या लहान भावाच्या निधनाचे वृत्त समजताच मोठ्या भावालाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवेढा शहरातील किल्ला भागात राहणारे सेवानिवृत्त मैलमजूर यांचे ३० वर्षीय पुत्र याचे कावीळ या अल्पशा आजाराने निधन झाले. निधनाची बातमी त्याच्या ३२ वर्षीय मोठ्या भावाला, समजताच त्याला मोठा मानसिक धक्का बसला. भावाच्या जाण्याचे असह्य दुःख त्याच्या हृदयाला सोसले नाही आणि त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. दुर्दैवाने, यातच त्याचेही प्राण गेले.
एकाच घरातील दोन तरुण विवाहित भावांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लहान भावाचा पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे, तर मोठ्या भावाचा पश्चात आई-वडील आणि मुलगा आहे. या घटनेमुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून, त्यांचे दुःख शब्दातीत आहे.
सख्खे भाऊ पक्के वैरी ही म्हण अनेकदा ऐकायला मिळते, मात्र बंधूंनी आपल्या प्रेमाने या म्हणीला छेद दिला आहे. लहान भावाच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने मोठ्या भावानेही प्राण सोडणे, ही घटना बंधुप्रेमाची पराकाष्ठा दर्शवते. या हृदयद्रावक घटनेने मंगळवेढ्यातील समाजमन सुन्न झाले आहे.