सांगोला-मिरज रेल्वे बोगद्यातील साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची पाहणी

सांगोला / प्रतिनिधी : सांगोला-मिरज रेल्वे मार्गावरील बोगद्यात साचणाऱ्या पाण्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
पाण्याच्या साचलेल्या जागेची पाहणी करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. “सततची तक्रार असूनदेखील यावर योग्य उपाय झाले नाहीत. आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच अधिकृत बैठक घेण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.
यानंतर खासदार मोहिते-पाटील यांनी वासुद येथील रेल्वे स्टेशन रस्त्याच्या कामाचीही पाहणी केली. कामाची गुणवत्ता चांगली ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या दौर्यात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, महेश नलवडे, तालुक्यातील ज्येष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदारांनी सांगोला तालुक्यातील विविध विकासकामांचाही आढावा घेतला आणि नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.