विशेष प्रतिनिधी :
शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष; स्नेहसंमेलनातील सहभागाने वाद तीव्र
सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल येथे उपमुख्याध्यापिका यांच्या नियुक्तीबाबत गंभीर वाद उफाळून आला आहे. शिक्षण विभागाच्या नियमानुसार आवश्यक प्रक्रिया न पाळता ही नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप असून, शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील त्यांच्या सक्रिय सहभागानंतर हा मुद्दा अधिकच ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, शिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्ती नियमबाह्य ठरवून दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने पालक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे.
न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ओळखली जाते. दरवर्षी डिसेंबरमध्ये होणारे वार्षिक स्नेहसंमेलन हे शाळेचे महत्त्वाचे सांस्कृतिक पर्व असते. मात्र कार्यक्रम पत्रिकेत नावाच्या सहभागानंतर त्यांच्या नियुक्तीबाबत नियमबाह्यतेच्या चर्चा सुरू झाल्या.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवाज्येष्ठता नियमांचा अर्थ सचिव आणि अध्यक्ष यांनी त्यांच्या सोयीस्कर पद्धतीने लावून सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. आवश्यक जाहिरात, सेवाज्येष्ठता यादीचा विचार व शिक्षण विभागाची अधिकृत मंजुरी न घेता ही नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यांच्या नियुक्तीपत्रावर शिक्षण विभागाची मुद्रा अथवा मंजुरीचा उल्लेख नसल्याचेही सांगण्यात येत आहे?
शिक्षण विभागाच्या नोंदींनुसार, ही नियुक्ती नियमबाह्य ठरवून सचिन जगताप यांनी स्पष्ट आदेश दिला आहे. तरीही, संबंधित उपमुख्याध्यापिका पदावर कार्यरत असल्याने “आदेश धाब्यावर बसवले जात आहेत का?” असा सवाल उपस्थित होत आहे. गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, शाळा व्यवस्थापनाने मुख्याध्यापकांवर दबाव टाकून ही नियुक्ती अमलात आणल्याचा आरोपही केला जात आहे.
पालक संघटनेतील एकाने सांगितले की, “आम्ही आमच्या पाल्यांचे भविष्य विश्वासाने शाळेकडे सोपवतो. नियमबाह्य नियुक्त्या झाल्या तर शैक्षणिक वातावरण बिघडते. स्नेहसंमेलनात उपमुख्याध्यापिका म्हणून त्यांचा सहभाग विद्यार्थ्यांसमोर चुकीचा संदेश देणारा आहे. याबाबत आम्ही शालेय शिक्षणमंत्री दादासो भुसे यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहोत.”
पालकांनी संस्थापक अध्यक्षांना सचिवांना सवाल केला म्हणाले, “संमेलन उत्साहात सुरू असले तरी हा वाद समोर आल्याने शाळेची प्रतिमा मलिन झाली आहे. मुख्याध्यापकांनी आणि संस्थेने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे.”
या प्रकरणामुळे शाळेतील इतर शिक्षकांमध्येही अस्वस्थता वाढली आहे. नियमबाह्य नियुक्त्यांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून, वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करून नियमानुसार उपमुख्याध्यापकाची नियुक्ती करावी आणि नियमभंग करणाऱ्या संस्थेवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शिक्षक व पालकांकडून होत आहे.

