सांगोला (प्रतिनिधी) :टीईटी परीक्षा सक्तीने लागू करण्याचा शासनाचा निर्णय आणि त्याचवेळी जुन्या पेन्शन योजनेबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने सांगोला तालुक्यातील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकदिवसीय शाळा बंद संप पुकारण्यात आला. या आंदोलनामुळे तालुक्यातील शिक्षण व्यवस्था अक्षरशः ठप्प झाली.
तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत 384 शाळांपैकी 324 शाळा पूर्णपणे बंद राहिल्या, तर केवळ 60 शाळांमध्येच अध्यापन झाले. एकूण 942 शिक्षकांपैकी 804 शिक्षकांनी संपात सहभाग घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुरू असलेल्या शाळांचा कारभार फक्त 138 शिक्षकांवर अवलंबून राहिल्याने अध्यापनावर मर्यादा आल्या. प्राथमिक शिक्षण विभागाला या संपाचा मोठा फटका बसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
माध्यमिक शिक्षण विभागातील परिस्थितीही तितकीच गंभीर होती. तालुक्यातील 85 माध्यमिक शाळांपैकी 43 शाळा बंद, तर 42 शाळा तुटपुंज्या उपस्थितीत सुरू होत्या. टीईटी सक्तीची अट तत्काळ रद्द करावी, तसेच जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीला न्याय द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
टीईटी सक्तीमुळे विशेषतः 53 वर्षांखालील शिक्षकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व शिक्षकांना परीक्षा देण्यास भाग पाडणे अन्यायकारक असल्याचा सूर उमटत असून, या निर्णयासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि शिक्षकांची बाजू ठामपणे मांडावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
याशिवाय शैक्षणिक वर्षाच्या मध्यात विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित नवीन निकष लावून मोठ्या प्रमाणावर शिक्षकांना ‘अतिरिक्त’ घोषित केले जात असल्याने शाळांच्या नियोजनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विषय शिक्षक उपलब्ध राहणार नाहीत आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनामुळे शिक्षणाची घडी विस्कटेल, असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेला तातडीने स्थगिती द्यावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
या सर्व प्रश्नांच्या निषेधार्थ सांगोला तालुक्यात शाळा बंद आंदोलन छेडण्यात आले असून, शासनाने लवकरात लवकर ठोस भूमिका न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा शिक्षक संघटनांकडून देण्यात आला आहे.
