Swargate Rape Caes : आरोपी दत्तात्रय गाडेला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी
शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पुणे : स्वारगेट एसटी बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला शुक्रवारी (ता. २८) पहाटे गुनाट (ता. शिरूर) येथील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. स्वारगेट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर, न्यायालयाने आरोपी दत्तात्रय गाडेला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
गुन्ह्याचा तपशील
मंगळवारी (ता. २५) पहाटे स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. याबाबत पीडितेने सकाळी ९ वाजता तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच दत्तात्रय रामदास गाडे (वय ३१, रा. गुनाट, ता. शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल केला.
अटकेसाठी पोलिसांचा जलद तपास
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल होताच, स्वारगेट बसस्थानकातील २३ सीसीटीव्ही आणि परिसरातील ४८ तासांचे फुटेज तपासले गेले. अवघ्या दीड तासांत आरोपीची ओळख पटली. यापूर्वीही दत्तात्रय गाडेवर २२ जानेवारी २०२४ रोजी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होता.
तपासात उघड झाले की, आरोपीवर २०१९ पासून पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर पोलीस ठाण्यांत एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेत, शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली.
महिलांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना
- महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहेत.
- महिलांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना
- २४ पोलिस गस्त वाढवणार
- एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक, निर्जन स्थळांची सुरक्षा वाढवली जाणार
- महापालिकेच्या सहकार्याने पथदिवे वाढवण्याचे नियोजन
- क्यूआर कोड मॅपिंगद्वारे सुरक्षितता मजबूत करण्याचे आदेश
- न्यायालयीन सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे
- स्वारगेट पोलिसांनी आरोपीला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर केले.
पोलिसांनी युक्तिवाद केला की,
- गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता आरोपीला १४ दिवसांची पोलिस कोठडी हवी.
- कपडे, मोबाईल जप्त करण्यासाठी तपासाची गरज आहे.
- आरोपीला मदत करणारे इतर कोणी आहेत का, याचा तपास होणे गरजेचे आहे.
- बचाव पक्षाने युक्तिवाद केला की,
- पीडित तरुणी स्वतः बसमध्ये चढली, त्यानंतर आरोपीही आत गेला.
- तीने कुठलाही प्रतिकार किंवा आरडाओरडा केला नाही.
- त्यामुळे हा प्रकार संमतीने झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पुढील तपास सुरू
पोलिसांकडून आता आरोपीची चौकशी सुरू असून, त्याचे इतर गुन्ह्यांशी कोणते संबंध आहेत, हे शोधले जात आहे. महाराष्ट्रातील महिला सुरक्षेबाबत या घटनेने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, प्रशासनाकडून यापुढे कडक पावले उचलली जाणार आहेत.