अहिल्यानगर / प्रतिनिधी : पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे रात्री अनैतिक संबंधाच्या संशयातून एका पतीने आपल्या पत्नीचा कात्रीने भोसकून निर्घृण खून केला. मृत पत्नीचे वय अंदाजे ३५ असून आरोपी पती याने स्वत: सकाळी पाथर्डी पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती व पत्नी हे आपल्या दोन मुलांसह व वृद्ध वडिलांसोबत एकनाथवाडीत राहत होते. रात्री उशिरा पती आणि पत्नी यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने घरात असलेली कात्री उचलून पत्नीवर अनेक वार करत खून केला. गुन्हा केल्यानंतर पतीने मोटारसायकल घेऊन घरातून निघून गेला.
घटनेवेळी घरात वृद्ध सासरे नव्हते. ते मंदिरात झोपण्यासाठी गेले होते. आठ वर्षांचा मुलगा आईला मारहाण झाल्याचे पाहून मंदिरात गेला व आजोबांना सांगितले की, “आईला वडीलांनी मारले आहे आणि ती उठत नाही.” आजोबा घरी परतल्यावर सुन रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली.
यानंतर नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, आरोपी पती दुसऱ्या दिवशी सकाळीच पाथर्डी पोलिस ठाण्यात हजर झाला आणि “पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून खून केला,” असे कबूल केले.
पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. मृतदेह प्रथम पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आला. मात्र, वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे तो अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला.
घटनास्थळाचा पंचनामा आणि मृतदेहाचा उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतर गुन्हा अधिकृतरीत्या नोंदवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
