धक्कादायक! नीट परीक्षेत 720 पैकी 710 गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याची व्हॉट्सॲप स्टेटस पोस्ट करून आत्महत्या!

पुणे/प्रतिनिधी : 19 वर्षीय एमबीबीएस विद्यार्थ्याने पुण्यात 12 मे रोजी पहाटे आत्महत्या केली. या विद्यार्थ्याने नीट परीक्षेत 720 पैकी तब्बल 710 गुण मिळवले होते.
तो मूळचा बीडचा रहिवासी होता. शैक्षणिक दबाव आणि मानसिक तणावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष पुण्यातील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या (AFMC) मैदानावर वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे आयोजित आंतर-महाविद्यालयीन क्रीडा महोत्सवात भाग घेण्यासाठी आला होता.
12 मे रोजी पहाटेच्या सुमारास तो त्याच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला. त्याने ऑनलाइन मागवलेल्या चाकूने गळा चिरून आत्महत्या केली. हे हृदयद्रावक कृत्य करण्यापूर्वी, उत्कर्षने व्हॉट्सॲपद्वारे आपल्या पालकांना एक सुसाईड नोट पाठवली होती आणि आपल्या मानसिक स्थितीबद्दल एक स्टेटस अपडेट देखील पोस्ट केली.
पोलिसांकडून तपास सुरू
वानवडी पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आत्महत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र ऑनलाइन कसे मागवले गेले याचा तपास करत आहेत. यासोबतच त्याचे फोन मेसेज आणि सोशल मीडिया स्टेटस अपडेट्सचीही पडताळणी केली जात आहे.