हरवलेला मोबाईल मिळाल्यावर वृद्ध आईच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
मुलुंड पोलीस ठाण्याने विशेष मोहिम राबवून हरवलेले आणि चोरीला गेलेले १० मोबाईल शोधून काढले.

मुंबई: मोबाईल हरवल्याने निराश झालेल्या एका ६५ वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवण्याचे काम मुलुंड पोलिसांनी केले आहे. हरवलेले आणि चोरीला गेलेले १० मोबाईल शोधून काढून तक्रारदारांना परत करण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली, त्यात एका आईला मुलाने वाढदिवसाला दिलेला मोबाईल पुन्हा मिळाला.
वाढदिवसाला मिळालेली भेट हरवल्याने होते निराशा
मुलुंड पश्चिम येथील शकुंतला रमेश जाधव (वय ६५) यांनी जानेवारी २०२५ मध्ये वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या मुलाने त्यांना सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन गिफ्ट म्हणून दिला. हा फोन मिळाल्याने त्या आनंदी होत्या, मात्र काही आठवड्यांतच प्रवासादरम्यान तो हरवला. मुलाने दिलेला फोन गमावल्याने त्या खूप नाराज झाल्या होत्या.
पोलिसांच्या प्रयत्नांमुळे मिळाला हरवलेला मोबाईल
शकुंतला जाधव यांनी मोबाईल हरवल्याची तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्या दररोज पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी करत होत्या, मात्र फोन मिळत नसल्याने निराश होऊन घरी परतत होत्या. मुलुंड पोलीस ठाण्याने विशेष मोहिम राबवून हरवलेले आणि चोरीला गेलेले १० मोबाईल शोधून काढले.
रान्या राव तुरुंगातच राहणार, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला!
शनिवारी पोलिसांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ ७ विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी, पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे यांच्या उपस्थितीत हे मोबाईल मूळ तक्रारदारांना परत केले. शकुंतला जाधव यांचा मोबाईल मिळाल्यावर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
मुलुंड सायबर सेलची विशेष कामगिरी
या संपूर्ण मोहिमेत मुलुंड सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक अमोल बोरसे, पोलीस उपनिरीक्षक शिवानंद आपुणे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मोबाईलचा शोध घेतला. शकुंतला जाधव यांनी पोलिसांचे आभार मानले आणि त्यांचा मोबाईल परत मिळाल्याने समाधान व्यक्त केले.