प्रवीण शिवपूजे : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शहरात दररोज नव्या घडामोडी घडत असून, प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख ना.एकनाथ शिंदे हे सांगोल्यात प्रचार सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
ही भव्य प्रचार सभा येत्या २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता “छत्रपती शिवाजी महाराज चौक, सांगोला” येथे संपन्न होणार असून, या सभेकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत ही सभा शिवसेनेसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी आमदार मा. शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचारसभा आयोजित करण्यात आली असून, या सभेच्या माध्यमातून सांगोल्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा अधिकृत प्रचार शुभारंभ होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारांना जनतेसमोर सादर करून पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे.
या सभेसाठी सांगोला तालुक्यासह आजूबाजूच्या माळशिरस, पंढरपूर व मोहोळ तालुक्यातून शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सभा केवळ प्रचारसभा न राहता शिवसेनेची सत्ता टिकवण्याची आणि बळकावण्याची राजकीय ताकद दाखवणारी शक्तिप्रदर्शन सभा ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून काय संदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपालिकेतील विकासकामे, राज्य सरकारच्या योजना, सामान्य नागरिकांसाठी घेतलेले निर्णय आणि शिवसेनेच्या भूमिकेवर ते प्रकाश टाकणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच सांगोला शहरासाठी विशेष विकास योजना जाहीर होण्याची शक्यताही वर्तवली जात असून, त्यामुळे शहरवासीयांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या इन पब्लिक न्यूजशी बोलताना सांगितले, या सभेमुळे सांगोल्यातील निवडणूक समीकरणांमध्ये मोठा बदल होऊ शकतो. सध्या विविध पक्षांमध्ये कडवी स्पर्धा पाहायला मिळत आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे शिवसेनेचा प्रचार अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे.
एकंदरीत, सांगोल्यातील ही प्रचार सभा केवळ राजकीय कार्यक्रम न राहता आगामी नगरपालिकेच्या सत्तेचा दिशादर्शक कार्यक्रम ठरणार आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरकडे सांगोल्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

