सोलापूर / प्रतिनिधी: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा-कुर्डुवाडी रस्त्यावर पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. वडिलांचा अंत्यविधी उरकून परतीच्या मार्गावर असताना ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात तरुणचा मृत्यू झाला. कुटुंब काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथे गेले होते. प्रवासादरम्यान वडिलांच्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी संपूर्ण कुटुंब सोलापूर जिल्ह्यात आले होते. अंत्यविधी आटोपून कुटुंब गुजरातकडे परतत असताना, वरकुटे गावाजवळ त्यांच्या कारने रस्त्यालगत असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली.
धडकेमुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील अन्य चार सदस्य गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना कळवले. सर्व जखमींना तात्काळ करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या दुहेरी दुःखद घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
