सोलापूर हादरलं: तिन्ही अल्पवयीन मुलांकडून काकावर हल्ला; आवाज ऐकून धावलेल्या मुलाचा दगडाने मारून खून

सोलापूर/प्रतिनिधी: सोलापूर जिल्ह्यातील वैराग जवळील सर्जापूर गावात रात्रीच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शेतात बसलेल्या तिघा अल्पवयीन मुलांना हटकल्याने एका काकावर हल्ला करण्यात आला, तर आवाज ऐकून धावत आलेल्या त्यांच्या पुतण्यावर दगडाने हल्ला करून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणात इमरान अमर पाटील (वय १४) या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शाहीर पाटील हे रात्री आपल्या शेतात गेले असता तिथे तीन अल्पवयीन मुले बसलेली आढळली. त्यांनी विचारणा केली असता तिघांनी अचानक काठी आणि दगडाने त्यांच्या काकावर हल्ला केला. काकाला होणाऱ्या मारहाणीचा आवाज ऐकून इमरान घटनास्थळी धावत आला आणि त्याने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तिघांपैकी एका मुलाने दगड फेकून इमरानच्या डोक्यावर घाव केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इमरानला तातडीने बार्शी येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, इमरानचे वडील अमर पाटील यांनी वैराग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या अमानवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.