माहूर / प्रतिनिधी : कर्जबाजारीपणाच्या मानसिक तणावाला कंटाळून माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शेतकऱ्याकडे फक्त 41 आर सामायिक शेती होती. त्यावरच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, सततच्या शेतीतील तोट्यामुळे आणि खाजगी सावकारांचे कर्ज वाढल्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
एका लग्नसमारंभासाठी बाहेर जातो, असे सांगून घराबाहेर पडलेला शेतकरी संध्याकाळपासून बेपत्ता होते. आज सकाळी वाघाई टेकडी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या शेजारी विषाची बाटली सापडली असून त्यांनी 350-400 मिली विष प्राशन केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेतकऱ्याचा मागे पत्नी, दोन मुले व वृद्ध आई-वडील असा परिवार असून त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. शासनाने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून आणि शेतकरी संघटनांकडून होत आहे.
