देश- विदेशमहाराष्ट्र

‘मराठी-कन्नड’ भाषावाद पुन्हा उफाळला! कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बससेवा अनिश्चित काळासाठी बंद… 

"आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत!" सरकारचा इशारा


इन पब्लिक न्यूज : कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बसवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड समर्थकांनी महाराष्ट्र एसटी बसचालकाच्या तोंडाला काळं फासून मारहाण केली.यानंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्नाटकात जाणाऱ्या सर्व एसटी बससेवा पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश दिले.

काय आहे प्रकरण?

शुक्रवारी रात्री चित्रदुर्ग येथे कन्नड रक्षक वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसचालकाला अडवले. “तुला कन्नड भाषा येते का?” असे विचारल्यानंतर त्याच्या तोंडाला काळे फासले आणि मारहाण केली. ही माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेत कर्नाटकात जाणाऱ्या सर्व एसटी बससेवा तातडीने थांबवण्याचा निर्णय घेतला.

सरकारचा इशारा :  “आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत!”

मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. गावगुंडांनी प्रसिद्धीसाठी महाराष्ट्राची बस अडवणे योग्य नाही. तुमच्या बससुद्धा महाराष्ट्रात” येतात. आम्ही आधी शिवसैनिक, नंतर मंत्री आहोत. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत!”

सरनाईक पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा कठोर निर्णय घ्यावा लागला.

भाषावादाच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला

कर्नाटकात एसटी बसचालकावर हल्ला झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्र सीमेवरील बेलगावमध्ये कर्नाटक बसच्या कंडक्टरला लक्ष्य करण्यात आले. त्या हल्ल्यात कंडक्टर जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली आहे. 

मराठी-कन्नड भाषावाद पुन्हा उफाळला

या हल्ल्यामागे मराठी-कन्नड भाषेचा वाद असल्याचे समोर आले आहे. सीमावर्ती भागात भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने अशा घटना घडत असून, यामुळे महाराष्ट्र-कर्नाटकमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button