अक्कलकोट/प्रतिनिधी : महिनाभर चाललेल्या पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या काळात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समिती पुढे सरसावली असून पूरग्रस्तांसाठी धान्य किट तसेच “स्वामी कृपावस्त्र” स्वरूपात मदतीचा हात पुढे केला आहे.
या धान्य किटमध्ये गहू, तांदूळ, साखर, रवा आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. तसेच मंदिरात वापरलेल्या शाल, सोवळे, उपरणे आदींना स्वामी समर्थांच्या कृपावस्त्रांचे स्वरूप देत पूरग्रस्तांना दिलासा देण्यात आला. ही मदत महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष व स्थानिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार देण्यात आली.
मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे म्हणाले…
नैसर्गिक आपत्ती व संकटाच्या काळात श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने प्रशासनास मदत करणे ही आमची जबाबदारी आहे. कोरोना काळातही देवस्थान समितीने मदतीचा हात दिला होता. पूरग्रस्तांसाठी ही मदत नक्कीच दिलासा देणारी ठरेल.
सामाजिक जबाबदारीची परंपरा कायम राखत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीने पुन्हा एकदा संकट काळात माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
