विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार घोषित: कोण कुठून लढणार?
भाजपने तीन, राष्ट्रवादी काँग्रेसने एक आणि शिवसेनेने एक उमेदवार जाहीर केला आहे

मुंबई/सहदेव खांडेकर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी २७ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीने अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये भाजपने तीन, राष्ट्रवादी काँग्रेसने एक आणि शिवसेनेने एक उमेदवार जाहीर केला आहे.
शिवसेनेत इच्छुकांची चुरस, अखेर रघुवंशींची निवड
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी शीतल म्हात्रे आणि संजय मोरे यांचीही नावं चर्चेत होती, मात्र इच्छुकांची मोठी गर्दी असल्याने शिंदे यांनी निर्णय घेण्यास वेळ घेतला. शेवटी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रघुवंशींचे नाव निश्चित करण्यात आले.
राष्ट्रवादीकडून संजय खोडके मैदानात
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांना उमेदवारी दिली आहे.खोडके हे विदर्भातील प्रभावशाली नेते असून, त्या भागात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या पत्नी आमदार सुलभा खोडके यांच्यासोबत विधानभवनात “पती-पत्नी आमदार” असा योग जुळून आला आहे.
भाजपने तीन जागांवर निष्ठावंतांना संधी
भाजपने विधानपरिषदेच्या तीन जागांसाठी दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांना विधानपरिषदेत संधी मिळणार, अशी चर्चा होती, मात्र ती पुन्हा फोल ठरली.
राजकीय वातावरण तापले!
विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस निर्माण होणार असून, अर्ज भरल्यानंतर उमेदवारांची अधिकृत यादी अंतिम करण्यात येईल. आता या निवडणुकीत कोण मारते बाजी, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.