
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख
सांगोला/ अविनाश बनसोडे : शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) कार्यकर्त्यांची बैठक सूतगिरणी येथे पार पडली. या बैठकीत पक्षसंघटना बळकट करणे, आगामी ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि पक्षाच्या भविष्यासाठी ठोस उपाययोजना आखणे यावर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आवाहन केले. महिला आघाडी आणि युवक संघटनांच्या वाढीसाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, आगामी ३ फेब्रुवारीपासून गावपातळीवर बैठका घेत कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. सर्वांनी पक्षसंघटनेसाठी अधिक सक्रिय राहून पुढील निवडणुकांसाठी सज्ज रहावे, असे आ.डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले.
दरम्यान, स्व. डॉ. आबासाहेबांचा अनुभव, कर्तुत्व आणि विचार हिमालयाएवढा मोठा होता. तो अनुभव आणि विचार मला व अनिकेत दादांना साध्य करणे कठीण आहे. आबासाहेब जनतेसाठी नेहमीच वेळ द्यायचे, त्यामुळे आपलीही तशीच अपेक्षा माझ्याकडून असणे स्वाभाविक आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात साडेतीन आठवडे मी मतदार संघाबाहेर होतो, याची सर्वांना जाणीव आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, पूर्वी आ. डॉ. बाबासाहेब फोन उचलायचे, मात्र आमदार झाल्यापासून फोनच उचलत नाहीत. वास्तविक, पूर्वी लोक अकरा-साडेअकरापर्यंत बंगल्यावर येत असत, पण आता ही गर्दी एक ते दोन वाजेपर्यंत सुरू असते. अशा वेळी फोन घेतल्यास समोरच्या व्यक्तीला गैरसमज होतो आणि न घेतल्यास फोन केला आहे त्यांची नाराजी होते. मात्र, लोकांची वाढती गर्दी मला अशी कुजबुज ऐकू येतीय की, आणि अपुरी वेळ ही माझी समस्या असून मी टी सर्वांसमोर मांडतो आणि गैरसमज करू नये म्हणून माझी बाजू स्पष्ट करतोय असे ते म्हणाले.
तसेच, आपला पक्ष आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. निवडणुकीच्या काळात आणि नंतरही अदृश्य शक्तीने आपल्याला मदत केली आहे. अनेकांनी आर्थिक आणि मानसिक पाठबळ दिले असून माझा अनुभव नसताना तुम्ही मला स्वीकारले. निवडणुकीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील पै-पै साठवून आम्हाला देणगी स्वरूपात मदत केली. निवडणुकीनंतर गावांनी हिशोब द्यायला हवा होता, मात्र मोजक्या लोकांनी तो दिला आहे. उर्वरित सर्वांनी लवकरात लवकर हिशोब द्यावा. काही मित्रांनी स्वतःच्या जमिनी, घर, शेती गहाण ठेवून पक्षासाठी निधी दिला आहे याची जाणीव पाहिजे आणि तात्काळ कागदोपत्री हिशोब द्यावा असे ते म्हणाले.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तसेच पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने ३ फेब्रुवारीपासून संघटन कार्य सुरू करणार आहे. महिला आघाडी आणि विविध महिला संघटनांसाठी आपण एकत्र काम करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक गावात ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक आणि चर्चा करून युवक व महिला संघटनांचे दस्तावेज आमच्याकडे जमा करावेत.
कार्यकर्त्यांनी पक्षासाठी अधिक मेहनत घेऊन जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन सरतेशेवटी करण्यात आले. दरम्यान या बैठकीला प्रमुख पदाधिकारी, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.