
विशेष प्रतिनिधी : सांगोला एस.टी. आगाराला नवीन पाच बस मिळाल्याचा लोकार्पण सोहळा मा. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते दिमाखात पार पडला. प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या नव्या बसेस अत्यंत गरजेच्या होत्या. ही गरज ओळखून मा. आमदार बापूंनी यांनी वेळोवेळी एस.टी. महामंडळाकडे पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश येत, सांगोला आगाराला पहिल्या टप्प्यात पाच बस प्राप्त झाल्या असून लवकरच आणखी दहा बस आगारात दाखल होणार आहेत.

एआय तंत्रज्ञानाने असलेली बस
या नव्या बसेस आधुनिक एआय तंत्रज्ञानाने सज्ज असून चालकाच्या ड्रायव्हिंग पद्धतीचा डेटा, बसचा वेग, डिझेलची बचत व यांत्रिक बिघाडाची माहिती लाईव्ह मॉनिटरिंग सिस्टिमद्वारे स्क्रीनवर दिसते. संभाव्य तांत्रिक अडचणी तत्काळ लक्षात येऊन अपघात किंवा बिघाड टाळता येतो, अशी माहिती डेपो मॅनेजर विकास पोपळे यांनी दिली.
आमदारांचा प्रत्यक्ष बसफेरीचा अनुभव
लोकार्पणानंतर मा. आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्वतः या नव्या बसमधून प्रवास करून बसमधील सुविधांची पाहणी केली. बसमधील मोबाईल चार्जिंग पॉइंट, आरामदायी आसनव्यवस्था, सुसज्ज आतील रचना पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

निवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव
या सोहळ्यावेळी आगारातील चार निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मानही मा. आमदार बापू यांच्या हस्ते करण्यात आला. ते म्हणाले, “या कर्मचाऱ्यांनी लालपरीतून हजारो प्रवाशांचा संसार चालवण्यासाठी स्वतःचा वेळ, श्रम अर्पण केला आहे. आज निवृत्तीच्या टप्प्यावर त्यांच्या कुटुंबांनीही केलेल्या त्यागाचे स्मरण करायला हवे.”

श्रेयवाद नाही…
बसेसच्या मंजुरीबाबत बोलताना बापू म्हणाले, “या बसेसची मागणी मी आमदारकीच्या काळात केली होती. परंतु त्याचे श्रेय घेण्याची गरज वाटत नाही. या बसेस डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या काळात आल्या, म्हणजे सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे शक्य झाले. कोणी एकटा काही करू शकत नाही.” ते पुढे म्हणाले की, “कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करू नये. हे काम जनतेसाठी आहे, कुणी श्रेय घ्यावं म्हणून नाही.”
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!