सांगोल्यातील शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकाऱ्याकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ?
शालेय पोषण आहाराला क्लीन चीट, अधिकारी-ठेकेदाराचे मोठे गौडबंगाल?

सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील कमलापूर गावातील शालेय पोषण आहार गोडाऊनमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शालेय पोषण आहारात उंदीर आणि घुषीच्या लेंड्या आढळल्या होत्या. हा विषारी आहार विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येत होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले, मात्र आश्चर्यकारकपणे अहवाल समोर आला. हा आहार स्वच्छ असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या पंचायत समितीच्या या कारभारावर विद्यार्थ्यांच्या पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होताना दिसतोय. तसेच प्रशासनाने हा गंभीर प्रकार दडपला की ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
या प्रकाराविरोधात बहुजन भारत सामाजिक संघटनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे, बुद्ध भीमराज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष ॲड. अक्षय तानाजी बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे आणि सोलापुरातील भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे यांनी याचा आवाज उठवला आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तेथील परिस्थितीची पाहणी केली. पडलेली घाण, उंदीर, घुषीच्या लेंड्यांतील धान्य त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगोला पंचायत समितीच्या या प्रकाराला, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ पाहून सोलापूर जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन केले होते. सामाजिक कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी लिखित अहवाल तयार केला आणि अहवाल वरिष्ठांना कळवला. मात्र यानंतर आता या अहवालाबाबत क्लीन चीट मिळाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
प्रशासनाची दडपशाही?
सुरुवातीच्या पाहणीत उंदीर व लेंड्यांनी दूषित झालेले धान्य आढळल्याचे सांगोल्यातील शिक्षणाधिकारी, गट अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. मात्र प्रयोगशाळेच्या अहवालात धान्य स्वच्छ असल्याचा निष्कर्ष देण्यात आला. त्यामुळे शालेय पोषण आहाराचा ठेकेदार आणि प्रशासन यांच्यात संगनमत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठेकेदारांवर कारवाई का नाही? उलट, क्लीन चिट…
या संपूर्ण प्रकरणात ठेकेदारांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट, क्लीन चिट मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.
प्रश्न अनुत्तरितच :
– विद्यार्थ्यांना दूषित आहार का दिला जात आहे?
– प्रयोगशाळेच्या अहवालात हेराफेरी झाली का?
– दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही?
– ठेकेदारांना अभय का दिले जात आहे?
याबाबत सांगोल्यातील प्रशासन, आमदार काय भूमिका घेणार आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी कोणते पावले उचलणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.