
मुंबई / प्रतिनिधी: उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातून देशाच्या राजकारणातील अनेक अज्ञात गोष्टींचा पर्दाफाश केला आहे. विशेषतः, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संबंधित घटनांचा उल्लेख करून राऊतांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
या पुस्तकात संजय राऊत यांनी दावा केला आहे की, गोध्रा हत्याकांडानंतर तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. तत्कालीन युपीए सरकारकडून सीबीआयसह विविध चौकशा सुरू होत्या. त्या काळात पवारांनी केंद्रीय कॅबिनेटमध्ये मोदींना अटक करणे योग्य नाही, असा ठाम मत व्यक्त केल्यामुळेच मोदींची अटक टळली, असा राऊतांचा दावा आहे.
“लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणं योग्य नाही, हे पवारांचं मत होतं आणि कॅबिनेटने त्यावर मूकसंमती दर्शवली” असं राऊत यांनी पुस्तकात नमूद केलं आहे. यावरून “मोदींनी त्या उपकाराचं स्मरण किती ठेवलं?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, राऊतांच्या या दाव्यांवर महायुतीकडून फारशी गंभीर प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली, तरी काही नेत्यांनी टोलेबाजी करत पुस्तकातील माहितीचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपसह शिंदे गटाकडून या पुस्तकातील मजकुराला “राजकीय फुगा” ठरवण्यात येत आहे.