सांगोला तालुक्यात खळबळ; जिल्हा परिषद शाळेत चोरट्यांची धाड! शिक्षणाधिकारी झोपेत
मुख्याध्यापकांनी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली

सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील बामणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणातून अज्ञात चोरट्यांनी थेट सीसीटीव्ही कॅमेरेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसविण्यात आलेले हे कॅमेरे चोरीला गेल्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मुख्याध्यापकांनी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बामणी शाळेच्या आवारात बसविण्यात आलेले एकूण ७ सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी वायरी कापून चोरून नेले. शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी असतात आणि सुरक्षेच्या दृष्टीनेच हे कॅमेरे बसविण्यात आले होते.
या घटनेमुळे केवळ शाळेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले नसून, शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेबाबतही चिंता वाढली आहे.
शाळा प्रशासन, ग्रामस्थ आणि पालक वर्गातून या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चोरट्यांचा लवकरात लवकर तपास करून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.