सांगोला/प्रतिनिधी : सांगोला शहरात अवैध दारूची वाहतूक करत असलेली बोलेरो जीप पकडून सांगोला पोलिसांनी ६ लाख २२ हजार ७५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ३० एप्रिल २०२५ रोजी सांगोला पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली होती की सांगोला शहरातून अवैध दारू वाहतूक केली जात आहे. पोलिस निरीक्षक दिनोदय घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. हणमंत दहिपरकर, पो.कॉ. धुळदेव चोरमुले आणि पो.कॉ. सद्दाम नदाफ यांनी कारवाई केली.
पोलिसांनी पंढरपूर-सांगोला रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जवळ सापळा रचून बोलेरो जीप (पांढऱ्या रंगाची) थांबवली. गाडीची झडती घेतली असता, १ लाख ७२ हजार ७५४ रुपयांची देशी-विदेशी कंपनीची अवैध दारू आढळून आली. यासोबतच ४ लाख ५० हजार रुपये किमतीची बोलेरो जीपही जप्त करण्यात आली.
आरोपीचे नाव प्रकाश चुडाप्पा शशदे (वय ४३, रा. मेडशिंगी, ता. सांगोला) असे आहे. त्याने कबूल केले की सदर दारू शरद मारुती मस्के (रा. कचेरी रोड, सांगोला) यांची आहे.
या प्रकरणी गु.र.नं. ३३६/२०२५ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई), ६५(फ) अंतर्गत पो.कॉ. सद्दाम नदाफ यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पो.स.ई. हणमंत दहिपरकर करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रताप यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिग्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
