
सांगोला : सांगोला तालुक्यातील वझरे येथे बनावट मृत्युपत्र तयार करून जमीन हडपल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sangola Police Station)
कृष्णा यादव लोखंडे (रा. महर्षी कॉलनी, अकलूज, ता. माळशिरस) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची आजी धुरपाबाई लकुळा वाघमारे यांचे निधन १/७/१९९७ रोजी झाले असताना आरोपींनी त्यांच्या मृत्यूची तारीख खोटेपणाने २/४/२००५ दाखवत ग्रामपंचायत वझरे (ता. सांगोला) येथून खोटा मृत्यू दाखला मिळवला.
यानंतर २६/७/२००० रोजी बनावट मृत्युपत्र तयार करण्यात आले. हे मृत्युपत्र आरोपी सुभाष बापू वाघमारे (रा. वझरे) यांनी तयार केले. त्यावर साक्षीदार म्हणून पांडुरंग रामचंद्र वाघमारे व भरत शंकर वाघमारे (दोघेही रा. वझरे) यांनी सह्या केल्या. यांचा मोरक्या म्हणून नितीन किसन रणदिवे (रा. नाझरे) यांनी या संपूर्ण प्रक्रियेत मदत केली करून जमीन हडपली.
या खोट्या मृत्युपत्राच्या आधारे वझरे येथील गट नं. २० क्षेत्र ५५ गुंठे व गट नं. १७ क्षेत्र १५.५० गुंठे इतकी जमीन सुभाष वाघमारे यांच्या नावावर करण्यात आली. त्यानंतर ७/८/२०२३ रोजी त्यांनी स्वतःच्या नावाचे प्रतिज्ञापत्र तयार केले आणि पुन्हा एकदा मयत धुरपाबाई लकुळा वाघमारे यांच्या नावावर असलेली जमीन आपल्या नावावर करून घेतली.
यानंतर सदर शेती जमीन सुभाष वाघमारे यांनी पुढे पूजा सतीश पलसंडे व सतीश भोजलिंग पलसंडे (दोघेही रा. बलवडी, ता. सांगोला) यांना खरेदीखताद्वारे विकली. या व्यवहारात साक्षीदार म्हणून नितीन किसन रणदिवे (रा. नाझरे) व बाळकृष्ण नारायण चौगुले (रा. यलमार, मंगळवारी) यांनी सह्या केल्या.(Sangola Police Station)
या संपूर्ण प्रकरणात सहभागी सर्व सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, सांगोला पोलीस ठाणे हे करत आहेत. (Sangola Police Station)