
सांगोला /रोहित हेगडे : सांगोला नगरपालिकेकडून भुयारी गटारी योजनेचे काम सुरू आहे. सुरू असलेल्या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात धूळ आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना याबाबत नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. उलट तक्रार आणि माहिती देऊन सुद्धा अधिकारी सुस्त बसले आहेत. नागरीकांच्या जीवाशी खेळ करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या डोक्यावर कोणाचा वरदहस्त आहे काय? तसेच एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतर नगरपालिका जागी होणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सांगोला तालुक्यातील डॉक्टर आणि तज्ज्ञांनी धूळीपासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु याबाबत नगरपालिकेला अनेक वेळा माहिती देऊन देखील कोणत्याही दखल घेतली जात नाही.
दरम्यान, उलट सत्य परिस्थितीला झाकून आणि अफवा सांगून लोकांची शुद्ध फसवणूक केली जात आहे. रस्त्यावरील प्रचंड धूळ लोकांच्या डोळ्यात जाऊ शकते परंतु फसवणूक आणि अफवा हे सांगून लोकांच्या डोळ्यात धूळ कशी काय घालता येईल ? असे नागरिकांनी म्हटले आहे.
यावर तात्काळ कारवाई करा अन्यथा याबाबत आंदोलन केले जाईल असेही इशारा सांगोलवाशीयांनी दिला आहे. ही योजना जरी अत्यंत चांगली असली तरी लोकांच्या जीवाशी खेळ करणारी असेल तर योजनाच नको आहे असा सूर सांगोलकरांनी धरला आहे.