
सांगोला/विशेष प्रतिनिधी : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धूळ, धूर, तसेच रस्त्यांवरील कचऱ्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. नागरिक वारंवार तक्रारी करत असले तरी सांगोला नगरपालिका या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे.
नगरपालिकेचा अॅक्शन प्लॅन नक्की काय आहे?
सांगोला नगरपालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी कोणते ठोस उपाययोजना केल्या जात आहेत? हा मोठा प्रश्न आहे. धूळ कमी करण्यासाठी रस्त्यांवर पाणी मारणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे, तसेच ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. मात्र, अधिकारी केवळ आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिले आहेत.
नगरपालिका नेमकं करतीय तरी काय?
शहरातील नागरिकांना सतत श्वसनाचे विकार, डोळ्यांचे संसर्ग, त्वचासंबंधी त्रास जाणवत आहेत. प्रदूषणामुळे शहरातील हवेचा दर्जा अत्यंत खालावला असून आरोग्य तज्ज्ञांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, नगरपालिकेकडून कोणताही ठोस अॅक्शन प्लॅन जनतेसमोर आणला गेला नाही.
सांगोला नगरपालिका नागरिकांचे जीव घेणार का?
नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील रस्त्यांवर नियमित साफसफाई नाही, कचऱ्याचा निचरा व्यवस्थित केला जात नाही. प्रशासन जर वेळीच जागे झाले नाही, तर येत्या काळात सांगोला प्रदूषणाच्या मोठ्या संकटाला सामोरे जाईल.
नागरिक :
नगरपालिकेने तातडीने पावले उचलावेत. एखाद्या नागरिकांचा जीव घेतल्यावर नगरपालिका उपाययोजना करणार काय ? खोटी माहिती देऊन नागरीकांची फसवणूक आता थांबली पाहिजे तसेच आता पाहायचं की सांगोला नगरपालिका या गंभीर समस्येवर ठोस उपाययोजना करते की फक्त चर्चाच सुरू राहते? असे नागरिकांनी सांगितले.