पंढरपूर सिहंगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न;

पंढरपूर / प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी (जि. सोलापूर) येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या वतीने “ माहिती तंत्रज्ञानातील नविन प्रवाह व डेटा सायन्स आणि क्लाऊड कंप्युटिंगचे भविष्य ” या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अनिल औदुंबर पिसे, वरिष्ठ सल्लागार, डेलॉईट व तांत्रिक भागीदार, क्युम्युलस सोल्युशन्स, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले, तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी केली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अनिल पिसे यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), यंत्र शिक्षण (ML), डेटा सायन्स व क्लाऊड कंप्युटिंग यामधील अद्ययावत ट्रेंड्स, भविष्यातील संधी, आणि त्यांचा उद्योगजगतातील उपयोग यावर सखोल मार्गदर्शन केले.
स्केलेबिलिटी, सुरक्षा, बिग डेटा प्रोसेसिंग यासारख्या संकल्पनांवर त्यांनी मार्मिक उदाहरणांसह प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर सत्रात सक्रिय सहभाग घेत आपले संदेह स्पष्ट केले. या वेबिनारमध्ये महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षाचे १२० हून अधिक विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. हा वेबिनार विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. संपत देशमुख यांचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचे यशस्वी संयोजन प्रा. एस. जी. लिंगे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.