धक्कादायक! पोटच्या मुलाने जन्मदात्या आईचा असा केला खून, आत्महत्येचा दिखावा
आईच्या अशा दुर्दैवी अंतमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

सांगोला/प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील कडलास येथे एका धक्कादायक घटना घडली आहे. पोटच्या मुलाने जन्मदात्या आईला मारहाण करून केबलच्या साहाय्याने गळा आवळून खून केला.
इतकेच नव्हे, तर त्याने आईने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यासाठी मृतदेह गावातील बौद्ध समाजमंदिराच्या स्लॅबवर नेऊन ठेवला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. १७) सकाळी १० च्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रतन शहाजी साळुंखे (वय ५०, रा. कडलास, ता. सांगोला) असे मृत मातेचे नाव आहे. या प्रकरणी कडलासचे पोलिसपाटील रघुनाथ विश्वंभर ननवरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित मुलगा तुकाराम साळुंखे याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १६) रात्री आरोपी तुकाराम याचे आई-वडिलांशी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाला कंटाळून रतन साळुंखे यांनी घर सोडले होते. रात्री उशिरापर्यंत त्या घरी परत न आल्याने मुलाने त्यांची शोधाशोध केली. त्या कडलास गावातील एका मंदिरात झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याचवेळी मुलाने आईला मारहाण केली आणि नंतर केबलच्या साहाय्याने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने मृतदेह समाजमंदिराच्या स्लॅबवर नेऊन गळ्याला केबल गुंडाळलेल्या अवस्थेत ठेवला, जेणेकरून हा आत्महत्येचा प्रकार वाटावा. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी केली आणि सत्य समोर आले.
या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, एका आईच्या अशा दुर्दैवी अंतमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.