अविरत सेवेचा झरा “डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान”सांगोला यांच्यावतीने ‘स्वच्छता मोहीम’
“देशांने आपल्याला काय दिलं यापेक्षा मी देशाला काय देतो” ही जाणीव पाहिजे : श्री सेवक

सांगोला/रोहित हेगडे : शहरात आज १२०० हून अधिक श्री सेवकांनी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमात शहरासह तालुक्यातील धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सेवक सहभागी झाले.
सेवेची भावना ठेवून या मोहिमेत अनेक श्री सेवकांनी परिसर स्वच्छ करण्यासाठी योगदान दिले. सांगोल्यातील स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी मजबूत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमातून शहरातील जवळपास १७ टन, १८ ट्रॅक्टर, २ टेम्पो एवढा मोठ्या प्रमाणात कचरा श्री सेवकांनी फक्त ३ तासात गोळा करून शहरात एक नवीन रेकॉर्ड बनवले आहे. यावेळी अरविंदभाऊ केदार, अध्यक्ष शिवप्रेमी मंडळ छत्रपती शिवाजी चौक, सागर दादा पाटील, युवा सेना जिल्हा अध्यक्ष, सचिन पाडे, कार्यालयीन अधीक्षक सां.न.सां., योगेश गंगाधरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सां.न.प. उपस्थित होते.


स्वच्छता मोहीम का महत्त्वाची
अलीकडच्या काळात व्यक्तीचे आरोग्यविषयीचे प्रश्न का निर्माण झाले आहेत याचा जर आपण शोध घेतला तर आपल्या आजूबाजूला पसरलेले घाणीचे साम्राज्य. हे साम्राज्य घालवण्यासाठी शासकीय यंत्रणा कमी पडत आहेत. त्यातून लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत.
यावर तोडगा काय म्हणून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे अनुयायी यांनी अनेक स्वच्छता मोहीम हाती घेतल्या. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, रस्त्यांची स्वच्छता अशा विविध स्वच्छता मोहिमा यशस्वी करून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे काम आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले.


श्रमदानात आपण सर्वजण एकत्र येणे गरजेचे आहे : डॉ.निकिता ताई देशमुख
इन पब्लिक न्यूजशी बोलताना डॉ.निकिता ताई देशमुख म्हणाल्या, या संस्थेचे डॉ.बाबासाहेब देशमुख आणि माझ्याकडून प्रथमता खूप खूप कौतुक, कारण हा अतिशय अनमोल उपक्रम आहे. या उपक्रमातून सांगोला शहरातील स्वच्छता आणि अनेक नागरिकांना याचा निश्चितच फायदा होईल. संत गाडगे महाराजांचा दाखला देत, त्या म्हणाल्या श्रमदानात आपण सर्वजण एकत्र येणे गरजेचे आहे. या माध्यमातून आपण आणि आपल्या परिसरातील स्वच्छता यातून आपले आरोग्य हे स्वच्छ असणं गरजेचं आहे. सांगोला शहरातील तसेच तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे असे आवाहन डॉ. निकिताताई यांनी केले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सांगोला शहरात प्रचंड प्रमाणात धूळ आहे. ही धूळ कमी करत असताना आपल्याला झाडे लावणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. सर्वांनी वृक्ष लागवड केली पाहिजे. तसेच आपण आपल्या घराच्या परिसरात झाडे लावून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे असे डॉ. निकिता ताई देशमुख म्हणाल्या.
“देशांने आपल्याला काय दिलं यापेक्षा मी देशाला काय देतो” ही जाणीव पाहिजे : श्री सेवक
इन पब्लिक न्यूजशी बोलताना श्री सेवक यांनी सवांद साधला. ते म्हणाले, आज सांगोला शहरात स्वच्छता अभियान सुरू असून हे २०१८ पासून ही मोहीम सांगोल्यात सुरू आहे. आपण दरवर्षी १ आणि २ मार्चला ही स्वच्छता मोहीम राबवत असतो. याचं कारण की ज्यांनी श्री सदस्य बैठकीतील सर्व सेवकांवर संस्कार सोहळा उभा केला. आपले आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी प्रत्येक वेळी निरूपणात एकच सांगितले की “देशांने आपल्याला काय दिलं यापेक्षा मी देशाला काय देतो” ही जाणीव असणे खूप महत्त्वाची आहे. माणूस म्हणून जगताना आपण समाजाप्रती कसं राहिलं पाहिजे हे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, स्वच्छता ही दोन प्रकारची असते. एक बाह्य स्वच्छता आणि एक अंतर्मन स्वच्छता. हे करण्यासाठी मन स्वच्छ असले पाहिजे. करण्यासाठी सुरुवातीला आपल्याकडे 205 पेक्षा अधिक श्लोक त्यांनी दिले आहेत. यातून आपलं अंतकरण स्वच्छ होताना मदत होते. श्रीसेवक अतिशय घाणीमध्ये हात घालतो, ती घाण उचलतो, याबाबत त्यांना काही वाटत नाही. कारण त्यांचा अंतर्मन हे अतिशय स्वच्छ आहे.
दरम्यान, सांगोला तालुक्यात आतापर्यंत जवळपास ११०० हून अधिक झाडे लावून संगोपन आम्ही करत आहोत असे त्यांनी सागितले. समाजासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टी या डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने केल्या जातात.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढेल, तसेच भविष्यात अधिक मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमा राबवण्यात येतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.