बिग ब्रेकिंग ! चोरट्यांचा पतसंस्था कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

सांगोला/अविनाश बनसोडे : शहरातील मिरज रोडवरील राऊत मळा परिसरात एका नामांकित पतसंस्थेतील कर्मचाऱ्यावर चोरट्यांनी प्राणघातक हल्ला करून लुटमार केली. हा प्रकार आज सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला, ज्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
असा केला हल्ला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पतसंस्थेतील कर्मचारी काम संपवून घरी जात असताना, चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात चटणी फेकून अचानक हल्ला केला. त्यानंतर कोयता आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्या हातावर आणि पाठीवर वार करून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटली आणि चोरटे पसार झाले.
गुन्हेगार आधीच परिसरात सक्रिय?
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसापासून काही संशयित व्यक्ती या भागात संध्याकाळी फिरत होते. सायंकाळी 6 ते 10 या वेळेत वेगवेगळ्या पोशाखात अज्ञात लोक परिसराची पाहणी करत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे अशी माहिती नागरिकांनी दिली.
सांगोला शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेनंतर सांगोल्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्री आठनंतर पोलिसांनी गस्त वाढवावी आणि गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी हल्लाग्रस्त कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी केली आहे.
पोलिसांनी तात्काळ तपास करून चोरट्यांना अटक करावी, अश्या मागणीचा जोर धरत आहे.