
सांगोला / रोहित हेगडे : सांगोला शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कामामुळे शहरात प्रचंड प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार होत आहेत. डोळ्यात झणझणीत अंजन घालून जनतेची फसवणूक केली जातीय का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
धूळ आणि अस्वच्छतेचा नागरिकांना त्रास
या गटार योजनेसाठी खोदकाम करण्यात आले असले तरी, संपूर्ण रस्त्यावर धुळीचा ढग उडत आहे. रस्त्यांवर सतत धूळ असल्याने छोट्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांचे विकार, आणि व्हायरल होत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष – उपाययोजना नाहीच!
शहरातील धूळ कमी करण्यासाठी पाण्याचे टँकर नियमित फवारणी करणे आवश्यक आहे, परंतु प्रशासन या दिशेने कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. टँकरच्या फेऱ्या वाढवणे गरजेचे असताना देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
चांगला उपक्रम, पण नागरिकांच्या जीवावर?
भुयारी गटार योजना ही सांगोला शहरासाठी एक चांगली सुविधा असली तरी, तिच्या अंमलबजावणीचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. यामुळे नागरिकांना प्रश्न पडला आहे की, या योजनेचा फायदा होण्याऐवजी हानीच होत आहे का? आणि जर ही योजना लोकांचा जीव घेणारी असेल तर तिचा काय फायदा आहे?
त्वरित कारवाई करा! : नागरीक
सांगोल्यातील नागरिक इन पब्लिक न्यूजशी बोलताना म्हणाले, प्रशासनाने रस्त्यांवर पाणी मारण्यासाठी अधिक टँकर आणि फेऱ्या वाढवाव्या. कामाचा दर्जा सुधारावा आणि रस्ते व्यवस्थित करावेत. तसेच नागरिकांच्या आरोग्यास होणाऱ्या दुष्परिणामांची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.