शासकीय गोदामामधून वाळू माफियांनी पळवली २ वाहने

सांगोला/प्रतिनिधी: माण, कोरडा नद्यातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करताना महसूल प्रशासनाने पकडून जप्त केलेल्या वाहनांपैकी तिघांनी मिळून संगनमताने दंड न भरण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टर व टेम्पो पळवून नेला. तसेच त्याठिकाणी लावलेल्या इतर वाहनांचे टायर काढून वाहनांच्या काचा फोडून शोची तोडफोड करून नुकसान केले.
ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास शासकीय गोदाम सांगोला याठिकाणी उघडकीस आली असून याप्रकरणी, ग्राम महसूल अधिकारी गौरव शशिकांत कुंभार यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला.
तहसीलदार संतोष कणसे यांच्या आदेशान्वये सायंकाळी ६ वाजता सांगोला तालुक्यातील माण, कोरडा नदीपात्रातून चोरून वाळूची वाहतूक करताना महसूल प्रशासनाने पकडून जप्त केलेली १६ वाहने दंडात्मक कारवाई करुन सांगोला तहसील कार्यालयात लावली होती.
दरम्यान तहसीलदार संतोष कणसे यांच्या आदेशान्वये सायंकाळी ६ वाजता सदरची वाळू चोरीतील १६ वाहने शासकीय धान्य गोदाम परिसरात हलवली होती. २५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास सदर वाहनांची तपासणी केली असता वाहने शासकीय गोदामात सुरक्षित होती, त्यानंतर त्याच दिवशी रात्री १० च्या सुमारास फिर्यादी
गौरव कुंभार, तलाठी कुमार रवी राजवाडे, मंडल अधिकारी महेश जाधव, तलाठी श्रीरंग लोखंडे यांनी लावलेली वाहने पाहण्याकरता गेले असता त्यावेळी सदर ठिकाणी काही लोक गोदामाच्या जवळ फिरताना दिसल्यावर त्यांना तेथून जाण्यास सांगितले.
दुसऱ्या दिवशी सकाळी १० च्या सुमारास फिर्यादी कार्यालयात असताना गोदामाचे अव्वल कारकून नितीन जाधव यांनी फोनवरून तुम्ही लावलेल्या वाहनांपैकी एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व एक बिगर नंबरचा टेम्पो लावलेल्या ठिकाणी नाहीत ते रात्री कोणीतरी घेऊन गेल्याचे सांगितले