पहलगाम हल्ल्यानंतर NIAचा तळ ठोकूण तपास ; संपूर्ण परिसर आणि स्थानिकांची कसून तपासणी

विशेष/प्रतिनिधी: पहलगाममधील बैसरन खोऱ्यात नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे तपासाची चक्रे फिरवली आहेत. एनआयएचे विशेष पथक बैसरन खोऱ्यात तळ ठोकून सखोल तपास करत आहे.
तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज
NIAच्या पथकात दहशतवादविरोधी यंत्रणेचे एक IG, एक DIG आणि एक SP दर्जाचे अधिकारी सहभागी आहेत. हे पथक प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत असून, हल्ल्याच्या घटनाक्रमाची सांगड घालण्यासाठी सर्व शक्य त्या बाबींची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती ‘ANI’ वृत्तसंस्थेने दिली आहे.
प्रवेश आणि निर्गमन बिंदूंची काटेकोर तपासणी
दहशतवाद्यांच्या हालचाली आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा मागोवा घेण्यासाठी एनआयएचे पथक बैसरन खोऱ्यातील सर्व संभाव्य प्रवेश व निर्गमन बिंदू बारकाईने तपासत आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळाच्या आसपासचा संपूर्ण परिसर झाडून तपासला जात आहे.
भयानक कटाचा उलगडा करण्याचा प्रयत्न एनआयएने सांगितले की, देशाला हादरवून सोडणाऱ्या या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करण्यासाठी पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी, तांत्रिक पुरावे आणि स्थानिक तपासाच्या आधारावर हल्ल्यामागील कटकारस्थानाचा शोध घेण्यात येत आहे.