
आयपीएल २०२५ मध्ये २३ मार्च रोजी एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात सामना झाला. या सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सला ४ गडी राखून पराभूत करत स्पर्धेत विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १५५ धावा करू शकला. याला उत्तर देताना चेन्नईने ६ गडी गमावून १९.१ षटकांत सामना जिंकला.
RCB च्या गोलंदाजीची कमाल, कोहली-सॉल्टच्या खेळीने मोठा विजय
चेन्नईच्या गोलंदाजीसमोर मुंबईचे फलंदाज हतबल झाले. केवळ तिलक वर्माच ३० हून अधिक धावा करू शकला. सलामीवीर रोहित शर्माला खातेही उघडता आले नाही. रोहित शर्माने केवळ ४ चेंडूंचा सामना केला. पहिल्याच षटकात तो खलील अहमदचा बळी ठरला. मात्र, शून्यावर बाद होऊनही रोहितने मोठा विक्रम नोंदवला. २३ मार्च रोजी रोहितने आयपीएलमध्ये आपला २५८ वा सामना खेळला. अशा प्रकारे, तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा दुसरा खेळाडू बनला. त्याने दिनेश कार्तिकला मागे टाकत ही मोठी कामगिरी केली.
डीकेला टाकले मागे
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. २००८ पासून आयपीएल खेळणाऱ्या धोनीने आतापर्यंत २६५ सामने खेळले आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून ५ हजारांहून अधिक धावा निघाल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर आता रोहित शर्माने कब्जा केला आहे, तर दिनेश कार्तिक तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. कोहलीने आयपीएलमध्ये २५३ सामने खेळले आहेत. त्यानंतर २४१ आयपीएल सामन्यांसह रवींद्र जडेजा पाचव्या क्रमांकावर आहे.
आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू:
- महेंद्रसिंग धोनी – २६५
- रोहित शर्मा – २५८
- दिनेश कार्तिक – २५७
- विराट कोहली – २५३
- रवींद्र जडेजा – २४१
- शिखर धवन – २२२
रोहितच्या नजरेत आणखी एक मोठा विक्रम
मुंबई इंडियन्स आपला दुसरा सामना २९ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात एक चौकार मारताच रोहित मोठा विक्रम करेल. भारतीय कर्णधाराला आयपीएलमध्ये ६०० चौकार पूर्ण करण्यासाठी फक्त एका चौकाराची गरज आहे. असे करणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरेल.