
अहमदनगर / प्रतिनिधी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीमार्फत या जमिनींची पाहणी केली जाणार आहे.
या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी एकूण ८२० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यात रस्ते, वीज, पाणी, ग्रामविकास, पर्यटन आदी क्षेत्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी शासनाने ठरवलेल्या ७०२ कोटींपेक्षा जास्त म्हणजे ८२० कोटींच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.
गायरान जमीन घरकुलासाठी:
पंतप्रधान आवास योजनेतील अडथळा ठरणाऱ्या जागेच्या समस्येवर मार्ग काढत गायरान जमीन लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरतो. यामुळे गरजू कुटुंबांना स्वतःचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सांस्कृतिक ठिकाणांचा विकास:
शाहीर विठ्ठल उमप आणि कवी अनंत फंदी यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, काही मंदिरांना ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे, ज्यामुळे पर्यटन आणि सांस्कृतिक विकासाला चालना मिळणार आहे.
बैठकीस खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार मोनिका राजळे, सत्यजीत तांबे, आशुतोष काळे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक राकेश ओला व इतर अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.