मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची ‘रेकी’; ज्योती मल्होत्राच्या फाइल्समध्ये ‘लालबागचा राजा’, ‘मुंबईचा राजा’चे व्हिडीओ सापडले

मुंबई / प्रतिनिधी: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ज्योती मल्होत्राने मुंबईच्या अनेक संवेदनशील ठिकाणांना भेट देत ‘रेकी’ केल्याचे गंभीर खुलासे समोर आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा संस्थांना मिळालेल्या माहितीप्रमाणे, मल्होत्राने जुलै ते सप्टेंबर २०२४ दरम्यान मुंबईला किमान तीन वेळा भेट दिली होती.
तिच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसवरील फॉरेन्सिक तपासणीत मुंबईतील लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा (गणेश गल्ली) यासारख्या गर्दीच्या ठिकाणांचे व्हिडीओ सापडले आहेत. हे व्हिडीओ फक्त धार्मिक श्रद्धेपुरते मर्यादित नसून, त्यात गर्दीचे व्यवस्थापन, प्रवेश आणि निर्गमन मार्ग, आजूबाजूचा परिसर यांचेही बारकाईने चित्रीकरण असल्याचे आढळले आहे.
तीन वेळा मुंबई भेट – रेल्वे, बस आणि सोशल मीडियातील संकेत
- पहिली भेट: ऑगस्ट २०२४, अहमदाबादहून मुंबई – कर्णावती एक्सप्रेसने प्रवास
- दुसरी भेट: सप्टेंबर २०२४, नवी दिल्लीहून मुंबई – पंजाब मेलने प्रवास
- तिसरी भेट: जुलै २०२४, लक्झरी बसने रस्ते मार्गे मुंबई प्रवास
या तिन्ही प्रवासांदरम्यान तिने अनेक ठिकाणांचे फोटो, व्हिडीओ टिपून ते तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर अप्रत्यक्षरित्या शेअर केले होते. विशेष म्हणजे, पंजाब मेलविषयी तिने “सीमा ओलांडून प्रेमाचे प्रतीक” अशा प्रकारची भावना व्यक्त करत पोस्ट लिहिलेली आढळली आहे, जी गुप्त हेतू लपवण्याचा प्रयत्न असल्याचा संशय आहे.
गणेशोत्सवाच्या नावाखाली हेरगिरीचा प्रयत्न?
मल्होत्राने सप्टेंबर २०२३ मध्ये गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील ‘लालबागचा राजा’ व ‘मुंबईचा राजा’ गणपतीला भेट दिली होती. मात्र या भेटीदरम्यान तिने केवळ दर्शनाच्याच नव्हे, तर स्थानिक लेआउट, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी, गर्दीचा प्रवाह यांचे विस्तृत व्हिडीओ रेकॉर्ड केले असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.
गंभीर चौकशी सुरू
हे व्हिडीओ आणि मीडिया फाइल्स केवळ तिच्या वापरासाठी नव्हते, तर त्याचा वापर देशविरोधी तत्त्वांनी मुंबईसारख्या संवेदनशील शहरावर संभाव्य कारवाया आखण्यासाठी केला गेला असावा, असा संशय आहे.
सध्या एनआयए, गुप्तचर यंत्रणा, आणि सायबर इन्व्हेस्टिगेशन युनिट्स या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. तिचे इतर मोक्याच्या ठिकाणांवरील अनधिकृत दौरे, परदेशी संपर्क व डेटा ट्रान्सफर यावरही तपास सुरू आहे.