राज्यसभेत महाकुंभवरून वाद! खरगे-धनखड यांच्यात तीव्र शाब्दिक युद्ध…
विरोधकांचे सरकारवर गंभीर आरोप, प्रशासनाने कुचराई केल्यामुळे दुर्घटना घडली

इन पब्लिक न्यूज : महाकुंभच्या भगदडीवरून संसदेत पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यसभेतील सभापती जगदीप धनखड आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात सोमवारी तीव्र वाद झाला. खरगे यांनी आपल्या भाषणात दावा केला की महाकुंभच्या भगदडीमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर धनखड यांनी संताप व्यक्त करत त्यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“जर मी चुकीचा असेल तर माफी मागेन” : मल्लिकार्जुन खरगे
राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “महाकुंभ दुर्घटनेत हजारो लोक मरण पावले आहेत. जर माझा दावा चुकीचा असेल, तर तुम्ही सत्य समोर आणा. मी माफी मागायला तयार आहे.” त्यांच्या या वक्तव्यावर सभापती धनखड यांनी आक्षेप घेतला आणि म्हणाले, “तुम्ही 1000 मृतांचा आकडा सांगत आहात, पण तुम्हाला कळतंय का की तुम्ही काय बोलत आहात? किती लोकांना यामुळे दु:ख होईल?”
सभागृहात गोंधळ, विरोधकांचा बहिष्कार
धनखड यांच्या या प्रतिक्रियेनंतरही खरगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि म्हणाले, “मग खरी संख्या काय आहे? किमान ती तरी स्पष्ट करा.” या वादानंतर राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारकडे मृतांची अधिकृत संख्या जाहीर करण्याची मागणी केली.
संसदेबाहेर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी देखील सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “महाकुंभ भगदडीच्या घटनेवर सरकारने स्पष्टता द्यावी. मृतांचा आकडा लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण व्यवस्था सामान्य नागरिकांसाठी नव्हती, तर फक्त व्हीआयपींसाठी होती.”
महाकुंभ व्यवस्थापनावर आरोप, चर्चेची मागणी फेटाळली
महाकुंभ दरम्यान प्रशासनाच्या कुप्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या खासदारांनी नोटीस दिली होती. मात्र, सभापती धनखड यांनी या नोटीस फेटाळली.
महाकुंभच्या मौनी अमावास्येच्या दिवशी लाखो भाविक गंगेत स्नानासाठी जमले होते. शाही स्नानाच्या आधी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने भगदड माजली. यात अनेक लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले.
विरोधकांचा सरकारवर निशाणा!
विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केले असून, प्रशासनाने कुचराई केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा केला आहे. मात्र, सरकारकडून अद्याप यावर कोणतेही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही.